Sunday, 27 April 2025

दुसऱ्या आशियाई योगासन चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत डॉ. शरयु विसपुते यांनी सुवर्णपदक पटकावले आहे


. नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत त्यांनी 'सिनियर बी' गटात पारंपरिक फॉरवर्ड बेंडिंग योगासनांमध्ये इतर २१ आशियाई देशांतील स्पर्धकांना मागे टाकत हे यश संपादन केले.

डॉ. शरयू विसपुते यांनी या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि आपल्या उत्कृष्ट योगासन कौशल्याचे प्रदर्शन करत निर्णायक विजय मिळवला. त्यांनी पारंपरिक फॉरवर्ड बेंडिंग योगासनांच्या प्रकारात अद्वितीय प्राविण्य दाखविले. त्यांच्या अचूक मुद्रा, लयबद्ध हालचाली आणि योगासनांवरील प्रभुत्व यामुळे त्यांना प्रतिस्पर्धकांवर सहजपणे मात करता आली.

या स्पर्धेत आशियातील एकूण २१ देशांतील योग साधकांनी सहभाग घेतला होता. डॉ. शरयू यांनी आपल्या वयोगटातील 'सिनियर बी' गटात कडवी झुंज देत सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून, संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय योगासनांची श्रेष्ठता सिद्ध केली आहे. डॉ. शरयू विसपूते यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि योगासनांवरील निष्ठेचे हे फळ आहे. या विजयामुळे भारतीय योगसाधकांना एक नवी ऊर्जा मिळाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे.

डॉ. शरयू विस्पुते यांनी यापूर्वीही अनेक योगासन स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. यासोबतच त्यांनी राज्यातील इतर योग स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सध्या त्या महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी कार्यरत असून, आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून त्या शतायु क्लिनिक व योग सेंटरच्या माध्यमातुन योगासनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

Saturday, 26 April 2025

अर्जंट रक्त मिळवणे होणार सोपे, जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशन (JDBDA) ची स्थापणा..

*जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशन ची स्थापना .*
*घर घर रक्तदाता, हर घर रक्तदाता..."* या घोष वाक्य द्वारे रक्तमित्र ही संकल्पना राबवणार..

जळगाव जिल्ह्यातील रक्तदात्यांना संघटित करून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याच्या पवित्र उद्देशाने जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशन या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची नोंदणी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून अधिकृतपणे प्रमाणित झाली असून, संस्था रक्तदानासारखे महत्त्वाचे कार्य करण्याचे सज्ज झाली आहे अशी माहिती ॲड. जमील देशपांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली.

असोसिएशनचे उद्दिष्ट असे आहे की, जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबात किमान एक रक्तदाता तयार करणे हे आहे. यासाठी विविध उपक्रम, जनजागृती मोहिमा, शाळा-कोलेजांत मार्गदर्शन, सामाजिक संस्था व डॉक्टर्सच्या सहकार्याने आयोजन करण्यात येणार आहे. नियमित रक्तदात्यांची यादी, त्यांची माहिती व गरज पडल्यास तातडीने संपर्क साधण्याची यंत्रणा विकसित केली जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर असोसिएशनची शाखा स्थापन केली जाईल व "रक्तमित्र" या घोष वाक्याद्वारे जनजागृती मोहिम राबवली जाईल. 

डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे (मोबाईल अ‍ॅप, व्हॉट्सअ‍ॅप गट, वेबसाइट) रक्तदात्यांचा डेटा संकलित केला जाईल. आपत्कालीन गरजेसाठी "24x7 रक्त हेल्पलाइन" सुरु करण्याचा मानस आहे.

जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशनचे सभासद होण्याकरिता
दिनांक १ मे २०२५ पासून नाव नोंदणी सुरू होणार आहे.ज्यांना किमान वर्षातून एकदा रक्तदान करण्याची इच्छा असेल अशा रक्तदात्यालाच असोसिएशनचे सभासद होता येईल.

रक्तदान ही श्रेष्ठतम मानवसेवा आहे. अपघातग्रस्त, मोठ्या शस्त्रक्रिया करणारे, कर्करोगग्रस्त, थॅलेसेमिया, हिमोग्लोबिनच्या कमतरतेने त्रस्त रुग्ण यांना वेळेवर रक्त उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. माणूसच माणसाला रक्तदान करू शकतो; त्यामुळे रक्तदात्यांचे संघटन आणि संवेदनशीलतेची गरज अधोरेखित होते.

"रक्तमित्र पुरस्कार"
नियमित रक्तदान करणाऱ्या, आपत्कालीन रक्त गरजेस प्रतिसाद देणाऱ्या व रक्तदानाबाबत जनजागृती करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी "रक्तमित्र पुरस्कार" देऊन गौरव करण्यात येईल.

"रक्तमित्र बँकेची स्थापना":
जळगाव जिल्ह्यातील सक्रिय रक्तदात्यांचा डेटा संकलित करून एक विश्वासार्ह व तत्काळ मदतीसाठी सज्ज "रक्तमित्र बँक" उभारण्यात येणार आहे. या बँकेमार्फत रक्ताची तातडीची गरज भासल्यास रुग्णांना नाममात्र दरात त्वरित मदत मिळवून दिली जाईल.

जनजागृती उपक्रम:
शाळा, महाविद्यालये, औद्योगिक संस्था व सामाजिक संघटनांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येईल. विविध ठिकाणी व्याख्याने, कार्यशाळा व रक्तदान शिबिरे आयोजित केली जातील.

डिजिटल सुविधा:
मोबाइल अ‍ॅप व वेबसाइटच्या माध्यमातून रक्तदात्यांची नोंदणी, गरज पडल्यास तातडीने संपर्क आणि माहितीची देवाण-घेवाण सुलभ करण्यात येईल.

24x7 रक्त हेल्पलाइन:
आपत्कालीन परिस्थितीमध्ये रक्त उपलब्धतेसाठी रात्रंदिवस कार्यरत हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात येणार आहे.

संस्थेचा मंत्र:घरघर रक्तदाता- हर घर रक्तदाता..
या उपक्रमांद्वारे जळगाव जिल्ह्यात रक्ताच्या गरजेची पूर्तता सुबक, शिस्तबद्ध आणि तात्काळ होईल, असा आत्मविश्वास संस्थापक ॲड. जमील देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.

लवकरच संस्थेच्या विश्वस्त मंडळामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करून संस्थेच्या कार्याला शुभारंभ करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशनचे विश्वस्त मंडळ खालील प्रमाणे ..
अध्यक्ष रक्तमित्र ॲड जमील देशपांडे, उपाध्यक्ष रक्तमित्र किरण तळले, सचिव रक्तमित्र ललित शर्मा, सह सचिव रक्तमित्र सतीश सैंदाणे, खजिनदार रक्तमित्र श्रीकृष्ण मंगळे, विश्वस्त रक्तमित्र, संदीप मांडोळे, रक्तमित्र महेंद्र सपकाळे, रक्तमित्र चेतन पवार,रक्तमित्र अविनाश पाटील,रक्तमित्र जितेंद्र पाटील, रक्तमित्र विक्रम कापडणे, रक्तमित्र राजेंद्र मिस्त्री, रक्तमित्र साजन पाटील असे आहेत.