Friday, 24 April 2026

*JCL --चमत्कारानंतर लगेच महाचमत्कार घडला..*

*JCL --चमत्कारानंतर लगेच महाचमत्कार घडला..*

*इतिहास घडला,महाविक्रम लगेच इतिहास (जमा) झाला..*

*२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…*

*दुसरा संघ आज ठरणार.. ओम भोसलेची १७० धावांची स्फोटक खेळी ठरली व्यर्थ*

*जळगाव दि. २४ प्रतिनिधी* - जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेटच्या रविवारी होणाऱ्या ग्रॅण्ड फायनल साठी पहिल्या क्वालिफायर मधून विजयी होत जळगाव कोगटा किंग च्या २४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटस ने थाटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा सुरू असलेल्या एलिमिनेटर सामन्यातून दुसरा क्वालिफायर साठी संघ ठरेल. दुसरी क्वालिफायर उद्या दि. २५ एप्रिल दुपारी ४ वाजता जैन ड्रीम स्पेसेस या  भव्य क्रीडांगणावर होईल.
अमळनेर सुहांस जायंटस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जळगाव कोगटा किंग्स संघाच्या फलंदाजीनी हा निर्णय पूर्णपणे फोल ठरविला. ओम भोसले याने सुरवातीच्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेत १० उत्तुंग षटकार व १७ चौकारांच्या मदतीने ७४ चेंडूंमध्ये १७० धावांची नाबाद स्फोटक खेळी खेळली.  त्याच्यासोबत अक्षय मेघानी  २१ धावा (१६ चेंडू), जितेंद्र नाईक २० धावा (१५ चेंडू), बिपिन चांगरे १३ धावा (११ चेंडू), पुर्वेश चौधरी ८ धावा (नाबाद) यांनी योगदान दिले. निर्धारीत २० षटकांत ३ गडींच्या मोबदल्यात २४२ धावांचा विक्रमी डोंगर उभा केला.  शुभम शर्मा च्या अचूक थ्रो ने जितेंद्र नाईक याला धावचीत केले. अमळनेर सुहांस जायंट संघातील केशव ठाकूर या गोलदांजाने ४ षटकांमध्ये दोन बळी घेतले. त्याच्या व्यतिरीक्त सर्व गोलंदाजांची पिटाई झाली.
धारदार प्रतिकार करत अमळनेर सुहांस जायंटसच्या फलंदाजांनी केवळ १८.३ षटकांत ३ गडी गमावत २४६ धावा करुन विशाल लक्ष्य गाठले.  रिषी यादव २६ (१७ चेंडू), मानव ट्रिबरेवाल २९ चेंडू ६ षटकार व ४ चौकारच्या मदतीने ६४ धावा करत विजयाचा पाया रचला. त्यावर रणजीत निकम व कर्णधार शुभम शर्मा यांच्या तेजतर्रार महत्त्वपूर्ण भागीदारीने हे लक्ष्य सहज पार केले. रणजीत निकम ने २८ चेंडूत ५ षटकार व ७ चौकार लगावत ७६ धावा केल्यात. तर शुभम शर्मा ने आक्रमक खेळी करत ३ षटकार ७ चौकार खेचून केवळ ३० चेंडूत ६५ धावा केल्यात. जळगाव कोगटा किंग्स चे कर्णधार जगदीश झोपे ने २ गडी बाद केले तर ३ षटकांत ५२ धावा देत राज बेलदारने १ गडी बाद केला. रणजीत निकम याला सामनावीर म्हणून पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यावेळी नितीन रेदासनी, जितेंद्र कोठारी आदी मान्यवर उपस्थीत होते.

Thursday, 23 April 2026

*चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स स्पर्धे बाहेर*

 *चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स स्पर्धे बाहेर* 


जळगाव, दि.23 (प्रतिनिधी) -
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेट स्पर्धेत आज पाचव्या दिवशी अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघाने विजय मिळविला तर रावेर रॉयल्स मात्र सामन्यातून बाद झाला. सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरणात ओम मुंडे याला मॅन ऑफ दी मॅचने गौरविले गेले. यावेळी अमित आहुजा, ज्ञानेश्वर पाटील, अभंग जैन, कुणाल शहा, विमल जैन, प्रतिक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. 
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघाने निर्धारित २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावांचा डोंगर उभा केला. चाळीसगाव संघाची सुरुवात तशी बेताचीच झाली होती. लोकेश पाटील (९ धावा) स्वस्तात बाद झाला तेव्हा धावफलकावर केवळ ३६ धावा होत्या. मात्र, त्यानंतर ओम मुंडे आणि साहिल गायकर या जोडीने मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. कर्णधार ओम मुंडेने ५६ चेंडूंत ५ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांसह ८५ धावांची खेळी करत संघाच्या डावाचा कणा मजबूत केला. त्याला साहिल गायकरने ७७ धावांची (४७ चेंडू, ९ चौकार, २ षटकार) झंझावाती साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला १६७ धावांच्या सुस्थितीत आणले.
गोलंदाजीमध्ये केवळ यश नहार आणि संदेश सुरवाडे यांनीच प्रतिस्पर्धी फलंदाजांना काहीसा लगाम घातला. यश नहारने आपल्या ४ षटकांत ६.५० च्या सरासरीने केवळ २६ धावा देत १ बळी टिपला. संदेश सुरवाडेने टिच्चून मारा करत केवळ २ षटकांत १८ धावांच्या मोबदल्यात २ महत्त्वाचे बळी मिळवले.
 *प्रमुख गोलंदाजांची स्थिती:* 
धवल हेमनानी: ४ षटके, २६ धावा (किफायतशीर पण यश नाही)
कृष्णा माळी: ३ षटके, ३८ धावा (१२.६७ ची महागडी सरासरी)
आमिर खान: ४ षटके, ३३ धावा
मोहम्मद नोमान: २ षटके, २३ धावा
अखेरची षटके ठरली निर्णायक
डावाच्या उत्तरार्धात तौसिफ मिर्झा आणि अशफाक शेख या गोलंदाजांना आपल्या लय शोधता आली नाही. त्यांच्या अवघ्या काही चेंडूंवर फलंदाजांनी मोकळेपणाने हात साफ केले, ज्यामुळे चाळीसगाव संघाला १८० चा टप्पा ओलांडणे सोपे झाले.
रावेर रॉयल्सने चांगले प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु १० गडी गमावून १९.३ षटकात १७५ धावा काढून या सामन्यात हरले आणि सामन्याच्या बाहेर देखील झाले. यश नहार व तुषार चोरडिया यांची दमदार सुरवात झाली. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघाचे गोलंदाज अमेय कोळी, सरज पाटील यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर ओम मुंडे, वकार शेख, अभि पाटील आणि लोकेश पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 
 *जळगाव कोगटा किंग्सचा संघ विजयी* 
टी-२० जेसीएल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी रात्री झालेल्या एकतर्फी सामन्यात जळगाव कोगटा किंग्सने आपला दबदबा निर्माण केला. सलामीवीर ओम भोसले आणि जितेंद्र नाईक यांच्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोगटा किंग्सने १९६ धावांचा डोंगर उभा केला. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना जामनेर सातपुडा हिरोजची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली आणि संपूर्ण संघ अवघ्या ८५ धावांत तंबूत परतला.

 *भोसले-नाईक यांची शतकी भागीदारी* 

डॉ. राजेश पाटील आणि सीमा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाणेफेक झाली. त्यात जामनेर सातपुडा हिरोज जिंकून जळगाव कोगटा किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. फलंदाजी स्वीकारलेल्या जळगाव कोगटा किंग्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सलामीवीर ओम भोसले याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत ३४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६४ धावा कुटल्या. त्याला जितेंद्र नाईक याने संयमी साथ देत ४२ चेंडूत ६४ धावा जोडल्या. या जोडीने पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
मध्य फळीत धावगती काहीशी मंदावली असली, तरी पुरवेश चौधरी (२३) आणि कर्णधार जगदीश झोपे (१७) यांनी मोक्याच्या क्षणी धावा काढल्या. जामनेरकडून ललित पाटीलने २७ धावांत ३ बळी घेत किंग्सला २०० धावांच्या आत रोखले. राम राठोडने २ तर अर्शद खानने १ गडी बाद केला.

 *जामनेरचा डाव पत्त्यासारखा कोसळला* 

१९७ धावांचे कठीण लक्ष्य समोर असताना जामनेर सातपुडा हिरोजची सुरुवात अत्यंत खराब झाली. ललित पाटील आणि राम राठोड हे दोन्ही सलामीवीर भोपळाही न फोडता बाद झाल्याने संघाची अवस्था १ धाव - २ बाद अशी केविलवाणी झाली. क्रीशी नाथानी (४) आणि मानस पाटील (२) हे देखील स्वस्तात माघारी परतले.
मधल्या फळीत मसूम खाटिकने २१ धावा आणि रामकृष्ण राठोडने १६ धावा करून थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने जामनेरचा डाव १९.४ षटकांत ८५ धावांवर आटोपला.

 *सागर भावरची भेदक गोलंदाजी* 

जळगाव कोगटा किंग्सच्या विजयात गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. सागर भावरने टिच्चून मारा करत ४ षटकांत केवळ १२ धावा देत ३ फलंदाजांना बाद केले. त्याला राज बेलदार (२/२) आणि बिपिन चांगरे (२/४) यांनी अचूक साथ देत जामनेरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. उबेद खाटिक आणि मनीष चव्हाण यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.
ओम भोसले याचा मॅन ऑफ द मॅच ने गौरविण्यात आले. यावेळी संघ मालक किरण बच्छाव, अतुल कोगटा, गौरव साफळे, ॲड. सूरज जहांगीर, हितेश मंडोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
 *थोडक्यात धावफलक:* 

जळगाव कोगटा किंग्स: २० षटकात १९६/८ (ओम भोसले ६४, जितेंद्र नाईक ६४; ललित पाटील ३/२७)
जामनेर सातपुडा हिरोज: १९.४ षटकात ८५/१० (मसूम खाटिक २१, रामकृष्ण राठोड १६; सागर भावर ३/१२, राज बेलदार २/२)

Wednesday, 22 April 2026

JCL 2-अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर विजयी*

*अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर विजयी*



जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच



*जळगाव दि.22 (प्रतिनिधी):* जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 मध्ये उपांत्यफेरीत पोहचण्याठी चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी रावेर रॉयल्स आणि पाचोरा एसकेटी योद्धाज यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात रावेरचा संघ विजयी झाला. दुसऱ्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्स संघाने दणदणीत विजय मिळवला. तत्पूर्वी २१ रोजी झालेल्या तिसऱ्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने विजय मिळवला. 
अमळनेर सुहांस जायंट्स आणि चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स यांच्यातील सामना रोमहर्षक झाला. चाळीसगाव संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. अमळनेर संघाची सुरूवात दमदार झाली. सलामीच्या जोडीने ४९ धावांची भागेदारी केली. मानव टिबरेवाल याने ३९ तर ऋषी यादव याने १० धावा केल्या. मधल्या फळीत आलेल्या अजय पाटील याने जोरदार फटकेबाजी केली. त्याने २७ चेंडूत ३४ धावा केल्या. त्यानंतर आलेले खेळाडू प्रभाव पाडू शकले नाही. परंतु सतीश चतुर्वेदी याने ११ चेंडूत २० धावा केल्या. त्यामुळे अमळनेर संघाची धावसंख्या आठ गडी गमावून निर्धारित २० षटकांत १४७ झाली. चाळीसगावकडून ओम मुंडे याने चार षटकांत केवळ १३ धावांत तीन महत्वाचे बळी टिपले. अमेय कोळी, कार्तिक बटुंगा, अभी पाटील, सूरज पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्यानंतर अमळनेरच्या गोलंदजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्सचे फलंदाज टिकाव धरू शकले नाही. अपवाद फक्त ओम मुंडे याचा राहिला. त्याने ३२ धावा केल्या. चाळीसगावचा संपूर्ण संघ १६.३ षटकांत ८४ धावांवर बाद झाला. त्यामुळे अमळनेरचा ६३ धावांनी विजय झाला. चाळीसगाव संघाच्या तीन महत्वाच्या फलंदाजांना बाद करणारा मोहम्मद सैफ सामनावीर ठरला. 

*रोमहर्षक सामन्यात रावेरचा पाहिला विजय*

पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या रावेर रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करत १९.२ षटकांत सर्व गडी गमावून १३० धावा केल्या. रावेरच्या संघात सलमावीर यश नहार याने २१ चेंडूत ३१ धावा केल्या. आदित्य वाणी याने ११, तुषार चोरडियाने २०, मोहम्मद नमीन याने २७, धवल हेमानी याने १२, प्रज्वल राजपूत याने २२ धावांची खेळी केल्यामुळे रावेरचा संघ १०० पार जाऊ शकला. पाचोराकडून कैलास पांडे आणि विरेन पाटील यांनी २-२ तर सचिन चौधरी आणि निलेश पाटील यांनी एक-एक बळी घेतला. १३१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या पाचोरा संघ 19.3 षटकांत 123 धावांवर गारद झाला. त्यामुळे रावेरचा सात धावांनी विजय झाला. आर्यन देशमुखने अवघ्या 10 चेंडूत 24 धावांची आक्रमक खेळी करत डावाला वेग दिला, तर सिद्धेश देशमुख (22) आणि विरेंद्र पाटील (20) यांनी मधल्या फळीत योगदान दिले. पण त्यांची खेळी संघाला यश मिळवून देऊ शकली नाही. रावेरकडून यश नहार आणि मोहम्मद नोमान यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धवल हेमदानी, अक्षय कोल्हे, कृष्णा माळी यांनी एक-एक बळी घेतला. तीन बळी, ३१ धावा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या यश नहार याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

*चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरचा दणदणीत विजय*
२१ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर संघाने पाचोरा एसकेटी योद्धाजवर सहा गडी राखून सहज विजय मिळवला. नाणेफेक ॲडिशनल एसपी संदीपकुमार गावित व सामना अधिकारी विनीत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी अभंग अजित जैन यांनी संदीपकुमार गावित यांचा सत्कार केला. प्रथम फलंदाजी करताना पाचोरा योद्धाजने २० षटकांत ९ गडी गमावून १०५ धावा केल्या. वीरेन पाटील (२९), रोहित तलरेजा (२५) आणि सचिन चौधरी (१४) धावांचे योगदान दिले. चाळीसगावकडून अभी पाटीलने ३ बळी घेतले, तर प्रणव जाधव व कोळी यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. १०६ धावांचे लक्ष्य चाळीसगाव संघाने केवळ १३.५ षटकांत पूर्ण केले. प्रशांत डोळे (३७), साहिल गायकर (२९) आणि कर्णधार ओम मुंडे (२४) यांनी दमदार फलंदाजी केली. यामुळे चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने सामना सहज जिंकला.

*आज क्वालीफायर ठरणार*
जेसीएलमधील साखळी फेरीचे आता दोन सामने बाकी आहे. त्यामुळे २३ एप्रिल रोजी क्वालीफायर ठरणार आहे. गुणतालिकेत जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग सहा- सहा गुण घेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे. 



*आजचे सामने (२३ एप्रिल)*
दुपारी ३ वाजता: रावेर रॉयल्स विरुद्ध X चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.
सायंकाळी ७.३० वाजता: पाचोरा एसकेटी योद्धाज X अमळनेर सुहांस जायंट्स.

*गुणतालिका*

संघ
सामने
विजयी
पराभूत
गुण
जामनेर सातपुडा हिरोज
4
3
1
6
जळगाव कोगटा किंग
4
3
1
6
अमळनेर सुहांस जायंट्स
4
2
2
4
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंन्जर्स
4
2
2
4
पाचोरा एसकेटी योद्धाज
4
1
3
2
रावेर रॉयल्स
4
1
3
2
रात्री ८ पर्यंत