Monday, 15 June 2026

सर्व पक्षात स्नेहील संबंध असणारेनंदूभाऊ महाजन : जनमानसात रुजलेलं अभ्यासू नेतृत्व, विधानपरिषदेसाठी सज्ज!

सर्व पक्षात स्नेहील संबंध असणारे
नंदूभाऊ महाजन : जनमानसात रुजलेलं अभ्यासू नेतृत्व, विधानपरिषदेसाठी सज्ज!
जळगाव: आजच्या बदलत्या राजकीय पटलावर सत्तेसाठी वारंवार भूमिका आणि पक्ष बदलणारे नेते जळगाव जिल्ह्याने पाहिले आहेत. अशा अस्थिर राजकीय वातावरणात सामान्य माणसाचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होत असताना, आपल्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून एकच पक्ष आणि एकच झेंडा सोबत ठेवणारे प्रामाणिक नेतृत्व म्हणून नंदूभाऊ महाजन यांच्याकडे पाहिले जाते. विधानपरिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, यंदाची लढाई महायुतीच्या भक्कम साथीने सोपी झाली असल्याचे चित्र आहे. तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा 'आमदार' पदाचा बहुमान नंदूभाऊ महाजन यांच्या रूपाने मिळणार असल्याच्या चर्चेवर आता जळगाव जिल्ह्यात शिक्कामोर्तब होत आहे.

*स्पष्टवक्तेपणा आणि माणुसकीची जपणूक*
 आजच्या राजकारणात शब्द आणि कृती यात मोठी दरी पाहायला मिळते. मात्र, नंदूभाऊ महाजन याला अपवाद आहेत. जे मनात तेच ओठावर, हा त्यांचा स्वभाव असून जनतेच्या प्रश्नांवर किंवा कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी बोलताना ते कोणाचीही भीडभाड ठेवत नाहीत. निवडणुकीच्या काळात अनेकदा समाजात जातीपातीचे राजकारण केले जाते. परंतु, नंदूभाऊंनी आपल्या सार्वजनिक जीवनात कधीही जाती-पातीच्या चौकटी स्वीकारल्या नाहीत. त्यांच्या मते, 'माणुसकी' हाच एकमेव धर्म आणि 'माणूस' हीच एकमेव जात आहे.

*शेतकरी समाजासाठी आशेचा नवा किरण*
नंदूभाऊ महाजन यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करताना संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण विकासाची कास धरली. त्यांच्या जिल्हा परिषद व जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या कार्यकाळात सर्व सहकारी सदस्यांचे मोठे पाठबळ त्यांच्या पाठीशी राहिले. तापी, पूर्णा आणि गिरणाकाठच्या शेतकरी समाजासाठी ते आता आशेचा नवा किरण ठरत आहेत. मतदारसंघामध्ये आमदारकीसाठीजी कोणी नेता नव्हे, तर एक कुटुंबप्रमुखच निवडणूक लढवत असल्याची भावना जनतेमधून व्यक्त होत आहे.

*महायुतीची भक्कम साथ; विक्रमी विजयाचा विश्वास*
जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या नगरसेवक व नगराध्यक्षांना जनतेचा प्रचंड कौल मिळाला असल्याने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित ताकद उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. गेल्या २५ वर्षांतील त्यांची सर्वसमावेशक छबी ही त्यांची जमेची बाजू आहे.


"पक्ष दोन नव्हे चार डोळ्यांनी पाहत असतो, हे नंदकिशोर महाजन यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर मांडलेले निरीक्षण तंतोतंत खरे आहे. महायुतीतील सर्व मतदार-लोकप्रतिनिधी आपली पक्षनिष्ठा व महायुतीचा धर्म नक्की निभावतील आणि हा विजय ऐतिहासिक असेल."
— चंद्रकांत बाविस्कर (जिल्हाध्यक्ष, भाजपा)

*पहिल्यांदाच खरा शेतकरी विधानपरिषदेची पायरी चढणार!*
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत व्यापारी किंवा बड्या नेत्यांच्या मर्जीतील व्यक्तीलाच आमदारकीची संधी मिळत आल्याचा इतिहास आहे. मात्र, विधानपरिषद हे कायदे करणारे वरिष्ठ सभागृह असल्याने तिथे अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्व जाणे गरजेचे आहे.
यंदा नंदूभाऊंच्या रूपाने खऱ्या अर्थाने जमिनीशी जोडलेला शेतकरी आणि ग्रामीण-नागरी प्रश्नांची उत्तम जाण असणारा लोकनेता सभागृहात पोहोचणार असल्याने, जनतेच्या प्रश्नांना अधिक प्रभावी आवाज मिळेल, असा ठाम विश्वास जिल्हाभरातून व्यक्त केला जात आहे.

जळगावात भाजपाचा व्हीप जारी,नंदकिशोर महाजन यांनाच प्रथम पसंतीचे मत देण्याचे निर्देश!

जळगावात भाजपाचा व्हीप जारी
नंदकिशोर महाजन यांनाच प्रथम पसंतीचे मत देण्याचे निर्देश!
​महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि गटनेते प्रकाश बालानी यांचे पत्र; सर्व नगरसेवकांना पक्षशिस्तीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश

​जळगाव:
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगरच्या वतीने अधिकृत व्हीप (पक्षदेश) जारी करण्यात आला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांच्या विजयासाठी पक्षशिस्त आणि एकजूट कायम राखत सर्व नगरसेवकांनी त्यांनाच प्रथम पसंतीचे मत द्यावे, असे आदेश या व्हीपद्वारे देण्यात आले आहेत.

​दिनांक १८ जून २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पूर्वतयारीसाठी भाजपाच्या प्रमुख नेत्यांची आणि नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया, मतदान पद्धती आणि पक्षाच्या धोरणात्मक भूमिकेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

*​पसंती क्रमांक '१' महाजनांसमोरच नोंदवा!*

​बैठकीत नगरसेवकांना मार्गदर्शन करताना, महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनाच प्रथम पसंतीचे मत देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. मतदान करताना मतपत्रिकेवर पसंती क्रमांक १ हा नंदकिशोर महाजन यांच्या नावासमोरच नोंदवावा, तसेच मत अवैध ठरणार नाही यासाठी कोणती तांत्रिक खबरदारी घ्यावी आणि निवडणूक आयोगाच्या कोणत्या नियमांचे पालन करावे, याचे सविस्तर प्रशिक्षण या वेळी लोकप्रतिनिधींना देण्यात आले.

*​पक्षादेश बंधनकारक; गटनेते आणि महानगराध्यक्षांचे पत्र*
​भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि मनपा गटनेते प्रकाश बालानी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने हा व्हीप जारी करण्यात आला आहे. पक्षाचा हा आदेश सर्व सदस्यांवर कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या बंधनकारक असून, याचे काटेकोर पालन करावे असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. महायुतीची एकजूट दाखवून देत महाजन यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी गटनेत्यांनी केले.
*​नगरसेवकांचा विजयाचा निर्धार*
​या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेचे स्वागत करत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी १८ जून रोजी होणाऱ्या मतदानात महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही सर्व लोकप्रतिनिधींनी या वेळी सामूहिकपणे व्यक्त केला.

Wednesday, 3 June 2026

*भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवाद' या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे जाहीर व्याख्यान*

*भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवाद' या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे जाहीर व्याख्यान* 


> व्याख्यान ६ जुन रोजी सायंकाळी ६.०० वा. छत्रपती संभाजी सभागृहात होणार असुन सकल हिंदु समाजाला उपस्थितीचे आवाहन. ॲड. अनिकेत निकम हे देखील याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आज संपूर्ण भारतातील हिंदू समाज श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या विचारांनी प्रभावित आहे. देशात हिंदू मध्ये जनजागृती घडवून भविष्यात आपली संस्कृती, प्राचीन धरोहर, सनातन धर्म आणि राष्ट्र सुरक्षित ठेवणे याकरिता त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. सकल हिंदूंमध्ये हिंदुत्वाचे विचार रुजवणारे एक श्रेष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. जळगावकरांना त्यांच्या या ओघवत्या आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित करणाऱ्या विचारांचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी या व्याख्यानाच्या माध्यमातून मिळणार आहे.
व्याख्यानाचे आयोजन बहुभाषिक ब्राह्मण संघ जळगांव यांनी केले आहे. 
*व्याख्यान सर्व हिंदूंसाठी खुला; पासेसची आवश्यकता नाही* आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्याख्यानासाठी कोणत्याही प्रकारच्या पासेस छापण्यात आलेल्या नाहीत. हे व्याख्यान संपूर्ण हिंदू समाज, माता-भगिनी आणि तरुणांसाठी पूर्णपणे खुले आहे. सभागृहातील पहिल्या तीन रांगा प्रायोजकांसाठी राखीव असतील, तर उर्वरित संपूर्ण सभागृह अनारक्षित आहे. त्यामुळे 'आधी येणाऱ्यास आधी प्राधान्य' (First Come, First Served) या तत्त्वावर नागरिकांना आसनव्यवस्था मिळणार आहे.

*आयोजक आणि प्रायोजक:*
'बहुभाषिक ब्राह्मण संघ, जळगाव' ही ज्ञाती संस्था असली तरी राष्ट्रीय विचार आणि हिंदुत्वाच्या प्रचार-प्रसारासाठी ती सदैव समर्पित राहून कार्य करते. या भव्य कार्यक्रमाचे प्रायोजकत्व ॲड. ओम त्रिवेदी, श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली., आर्की. नितीन पारगावकर, संजय व्यास, नंदलाल अडवाणी आणि सपन झुनझुनवाला यांचे सहकार्य लाभत आहे.

*उपस्थित राहण्याचे आवाहन:*
या व्याख्यानातून जळगावकरांमध्ये एक नवी राष्ट्रीय ऊर्जा निर्माण होणार आहे. तरी जळगाव शहरातील व परिसरातील सकल हिंदू बांधव, माता-भगिनी आणि युवा पिढीने आपल्या कुटुंबासह व मित्रपरिवारासह या व्याख्यानाचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक *'बहुभाषिक ब्राह्मण संघ, जळगाव'* यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Monday, 18 May 2026

बक्राईद का त्योहार, पुलिस की भूमिका जाहिर...

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित मुस्लिम नागरिक, विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज आयोजित करण्यात आली.

या बैठकीस पोलीस प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य विभाग, महावितरण, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये बकरी ईद सण शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या तसेच त्यांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

पोलीस प्रशासनातर्फे शहर व जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून एसआरपीएफ जवान तसेच होमगार्ड पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येत असून प्रमुख चौक, धार्मिक स्थळे व गर्दीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच “गुड मॉर्निंग स्क्वॉड” अलर्ट करण्यात आला असून समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात विविध ठिकाणी चेक नाके सक्रिय करण्यात आले असून संशयित वाहनांची व व्यक्तींची तपासणी सुरू आहे. सोशल मीडियावर देखील विशेष लक्ष ठेवण्यात येत असून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
बैठकीमध्ये शासनाच्या नियमांनुसार गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती देण्यात आली. गोवंश हत्या कायद्याने गुन्हा असून कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन करू नये, असे आवाहन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कृत्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला.

मुस्लिम नागरिकांना पोलिसांतर्फे खालील सूचना देण्यात आल्या :
• गोवंश हत्या कायद्याने गुन्हा आहे.
• ३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तसेच गरोदर जनावरांची कत्तल करू नये.
• उघड्यावर कत्तल अथवा मांस विक्री करू नये.
• टॅग केलेल्या जनावरांचीच कत्तल करावी.

महानगरपालिकेस खालील सूचना देण्यात आल्या :
• जास्तीत जास्त ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात यावी.
• ट्रॅक्टरला खालून व वरून काळे मेणकापड लावण्यात यावे.
• परिसरानुसार ट्रॅक्टरची फ्रीक्वेन्सी वाढविण्यात यावी.
• ट्रॅक्टरसाठी जबाबदार व प्रशिक्षित चालक नियुक्त करण्यात यावेत.
• पाण्याची आवश्यक व्यवस्था करण्यात यावी.
• कुठेही रक्त वाहून जाणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी.

तसेच नागरिकांनी शांतता, सलोखा व परस्पर सौहार्द कायम ठेवून प्रशासनास सहकार्य करावे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

— जळगाव जिल्हा पोलीस प्रशासन

Saturday, 16 May 2026

नामदार गिरीश भाऊंचा बंपर महाधमाका .. अबब 4 हजार कोटी?

*वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून गिरणा खोऱ्यासाठी जलसिंचनाचे मोठे गिफ्ट, उत्तर महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प; तब्बल ४ हजार ११६ कोटींच्या कामाला सुरुवात होणार* :- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
----------------------------------
नाशिक :(दि.१६/०५/२०२७) अनेक दशकांपासून पाणीटंचाई, अनियमित पाऊस आणि दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रासाठी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प हा खऱ्या अर्थाने ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ४ हजार ११६ कोटी रुपयांच्या कामाचे वर्क ऑर्डर जारी करत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला हिरवा कंदील दिला आहे.
गिरणा खोरे प्रकल्प विभाग, नाशिक यांच्या माध्यमातून मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) आणि आयसीसी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाला हे काम देण्यात आले आहे. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्राच्या जलसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.
नार-पार-गिरणा प्रकल्पाची मूळ संकल्पना म्हणजे कोकण पट्ट्यातील आणि पश्चिमेकडे समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पावसाचे पाणी वळवून ते दुष्काळी गिरणा नदी खोऱ्यात आणणे. सुरगाणा, पेठ आणि परिसरातील नदी खोऱ्यांमधील पाणी विविध धरणे, पंपिंग स्टेशन, बोगदे आणि पाइपलाइनच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात पोहोचवले जाणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत उंबरपाडा, सारन्यावन, प्रतापगड, राक्षसभुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या नऊ ठिकाणी धरणांची उभारणी केली जाणार आहे. याशिवाय माणखेड आणि सालभोये येथे मोठे जलसाठे उभारण्यात येणार असून अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रो-मेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचे जाळे तयार होणार आहे. गिरणा खोऱ्याकडे पाणी वळवण्यासाठी विशेष बोगदेही उभारले जाणार आहेत.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील  हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळू शकतो. विशेषतः नाशिक, जळगाव आणि धुळे परिसरातील कोरडवाहू शेतीला मोठा आधार मिळणार असून कृषी उत्पादन वाढीस चालना मिळेल. त्याचबरोबर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही वर्षांत या प्रकल्पावर पर्यावरणीय मंजुरी, वनक्षेत्र, जमीन संपादन, आदिवासी भागातील पुनर्वसन आणि खर्चवाढ यांसारख्या मुद्द्यांवर मोठी चर्चा झाली होती. मात्र राज्य शासनाने प्रकल्पाला प्राधान्य देत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
--------------------------------
" *हवामान बदल, घटते भूजल आणि वाढती पाण्याची मागणी या पार्श्वभूमीवर नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प हा केवळ सिंचन प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यातील जलसुरक्षेचा आधारस्तंभ ठरणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहिणारा ठरेल. राज्याचे  लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांचे दूरदृष्टी व नियोजनातून हा प्रकल्प साकार होणार आहे* ". :- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. 
------------------------------------

Friday, 24 April 2026

*JCL --चमत्कारानंतर लगेच महाचमत्कार घडला..*

*JCL --चमत्कारानंतर लगेच महाचमत्कार घडला..*

*इतिहास घडला,महाविक्रम लगेच इतिहास (जमा) झाला..*

*२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…*

*दुसरा संघ आज ठरणार.. ओम भोसलेची १७० धावांची स्फोटक खेळी ठरली व्यर्थ*

*जळगाव दि. २४ प्रतिनिधी* - जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेटच्या रविवारी होणाऱ्या ग्रॅण्ड फायनल साठी पहिल्या क्वालिफायर मधून विजयी होत जळगाव कोगटा किंग च्या २४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटस ने थाटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा सुरू असलेल्या एलिमिनेटर सामन्यातून दुसरा क्वालिफायर साठी संघ ठरेल. दुसरी क्वालिफायर उद्या दि. २५ एप्रिल दुपारी ४ वाजता जैन ड्रीम स्पेसेस या  भव्य क्रीडांगणावर होईल.
अमळनेर सुहांस जायंटस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जळगाव कोगटा किंग्स संघाच्या फलंदाजीनी हा निर्णय पूर्णपणे फोल ठरविला. ओम भोसले याने सुरवातीच्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेत १० उत्तुंग षटकार व १७ चौकारांच्या मदतीने ७४ चेंडूंमध्ये १७० धावांची नाबाद स्फोटक खेळी खेळली.  त्याच्यासोबत अक्षय मेघानी  २१ धावा (१६ चेंडू), जितेंद्र नाईक २० धावा (१५ चेंडू), बिपिन चांगरे १३ धावा (११ चेंडू), पुर्वेश चौधरी ८ धावा (नाबाद) यांनी योगदान दिले. निर्धारीत २० षटकांत ३ गडींच्या मोबदल्यात २४२ धावांचा विक्रमी डोंगर उभा केला.  शुभम शर्मा च्या अचूक थ्रो ने जितेंद्र नाईक याला धावचीत केले. अमळनेर सुहांस जायंट संघातील केशव ठाकूर या गोलदांजाने ४ षटकांमध्ये दोन बळी घेतले. त्याच्या व्यतिरीक्त सर्व गोलंदाजांची पिटाई झाली.
धारदार प्रतिकार करत अमळनेर सुहांस जायंटसच्या फलंदाजांनी केवळ १८.३ षटकांत ३ गडी गमावत २४६ धावा करुन विशाल लक्ष्य गाठले.  रिषी यादव २६ (१७ चेंडू), मानव ट्रिबरेवाल २९ चेंडू ६ षटकार व ४ चौकारच्या मदतीने ६४ धावा करत विजयाचा पाया रचला. त्यावर रणजीत निकम व कर्णधार शुभम शर्मा यांच्या तेजतर्रार महत्त्वपूर्ण भागीदारीने हे लक्ष्य सहज पार केले. रणजीत निकम ने २८ चेंडूत ५ षटकार व ७ चौकार लगावत ७६ धावा केल्यात. तर शुभम शर्मा ने आक्रमक खेळी करत ३ षटकार ७ चौकार खेचून केवळ ३० चेंडूत ६५ धावा केल्यात. जळगाव कोगटा किंग्स चे कर्णधार जगदीश झोपे ने २ गडी बाद केले तर ३ षटकांत ५२ धावा देत राज बेलदारने १ गडी बाद केला. रणजीत निकम याला सामनावीर म्हणून पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यावेळी नितीन रेदासनी, जितेंद्र कोठारी आदी मान्यवर उपस्थीत होते.

Thursday, 23 April 2026

*चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स स्पर्धे बाहेर*

 *चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स स्पर्धे बाहेर* 


जळगाव, दि.23 (प्रतिनिधी) -
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेट स्पर्धेत आज पाचव्या दिवशी अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघाने विजय मिळविला तर रावेर रॉयल्स मात्र सामन्यातून बाद झाला. सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरणात ओम मुंडे याला मॅन ऑफ दी मॅचने गौरविले गेले. यावेळी अमित आहुजा, ज्ञानेश्वर पाटील, अभंग जैन, कुणाल शहा, विमल जैन, प्रतिक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. 
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघाने निर्धारित २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावांचा डोंगर उभा केला. चाळीसगाव संघाची सुरुवात तशी बेताचीच झाली होती. लोकेश पाटील (९ धावा) स्वस्तात बाद झाला तेव्हा धावफलकावर केवळ ३६ धावा होत्या. मात्र, त्यानंतर ओम मुंडे आणि साहिल गायकर या जोडीने मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. कर्णधार ओम मुंडेने ५६ चेंडूंत ५ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांसह ८५ धावांची खेळी करत संघाच्या डावाचा कणा मजबूत केला. त्याला साहिल गायकरने ७७ धावांची (४७ चेंडू, ९ चौकार, २ षटकार) झंझावाती साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला १६७ धावांच्या सुस्थितीत आणले.
गोलंदाजीमध्ये केवळ यश नहार आणि संदेश सुरवाडे यांनीच प्रतिस्पर्धी फलंदाजांना काहीसा लगाम घातला. यश नहारने आपल्या ४ षटकांत ६.५० च्या सरासरीने केवळ २६ धावा देत १ बळी टिपला. संदेश सुरवाडेने टिच्चून मारा करत केवळ २ षटकांत १८ धावांच्या मोबदल्यात २ महत्त्वाचे बळी मिळवले.
 *प्रमुख गोलंदाजांची स्थिती:* 
धवल हेमनानी: ४ षटके, २६ धावा (किफायतशीर पण यश नाही)
कृष्णा माळी: ३ षटके, ३८ धावा (१२.६७ ची महागडी सरासरी)
आमिर खान: ४ षटके, ३३ धावा
मोहम्मद नोमान: २ षटके, २३ धावा
अखेरची षटके ठरली निर्णायक
डावाच्या उत्तरार्धात तौसिफ मिर्झा आणि अशफाक शेख या गोलंदाजांना आपल्या लय शोधता आली नाही. त्यांच्या अवघ्या काही चेंडूंवर फलंदाजांनी मोकळेपणाने हात साफ केले, ज्यामुळे चाळीसगाव संघाला १८० चा टप्पा ओलांडणे सोपे झाले.
रावेर रॉयल्सने चांगले प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु १० गडी गमावून १९.३ षटकात १७५ धावा काढून या सामन्यात हरले आणि सामन्याच्या बाहेर देखील झाले. यश नहार व तुषार चोरडिया यांची दमदार सुरवात झाली. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघाचे गोलंदाज अमेय कोळी, सरज पाटील यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर ओम मुंडे, वकार शेख, अभि पाटील आणि लोकेश पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 
 *जळगाव कोगटा किंग्सचा संघ विजयी* 
टी-२० जेसीएल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी रात्री झालेल्या एकतर्फी सामन्यात जळगाव कोगटा किंग्सने आपला दबदबा निर्माण केला. सलामीवीर ओम भोसले आणि जितेंद्र नाईक यांच्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोगटा किंग्सने १९६ धावांचा डोंगर उभा केला. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना जामनेर सातपुडा हिरोजची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली आणि संपूर्ण संघ अवघ्या ८५ धावांत तंबूत परतला.

 *भोसले-नाईक यांची शतकी भागीदारी* 

डॉ. राजेश पाटील आणि सीमा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाणेफेक झाली. त्यात जामनेर सातपुडा हिरोज जिंकून जळगाव कोगटा किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. फलंदाजी स्वीकारलेल्या जळगाव कोगटा किंग्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सलामीवीर ओम भोसले याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत ३४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६४ धावा कुटल्या. त्याला जितेंद्र नाईक याने संयमी साथ देत ४२ चेंडूत ६४ धावा जोडल्या. या जोडीने पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
मध्य फळीत धावगती काहीशी मंदावली असली, तरी पुरवेश चौधरी (२३) आणि कर्णधार जगदीश झोपे (१७) यांनी मोक्याच्या क्षणी धावा काढल्या. जामनेरकडून ललित पाटीलने २७ धावांत ३ बळी घेत किंग्सला २०० धावांच्या आत रोखले. राम राठोडने २ तर अर्शद खानने १ गडी बाद केला.

 *जामनेरचा डाव पत्त्यासारखा कोसळला* 

१९७ धावांचे कठीण लक्ष्य समोर असताना जामनेर सातपुडा हिरोजची सुरुवात अत्यंत खराब झाली. ललित पाटील आणि राम राठोड हे दोन्ही सलामीवीर भोपळाही न फोडता बाद झाल्याने संघाची अवस्था १ धाव - २ बाद अशी केविलवाणी झाली. क्रीशी नाथानी (४) आणि मानस पाटील (२) हे देखील स्वस्तात माघारी परतले.
मधल्या फळीत मसूम खाटिकने २१ धावा आणि रामकृष्ण राठोडने १६ धावा करून थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने जामनेरचा डाव १९.४ षटकांत ८५ धावांवर आटोपला.

 *सागर भावरची भेदक गोलंदाजी* 

जळगाव कोगटा किंग्सच्या विजयात गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. सागर भावरने टिच्चून मारा करत ४ षटकांत केवळ १२ धावा देत ३ फलंदाजांना बाद केले. त्याला राज बेलदार (२/२) आणि बिपिन चांगरे (२/४) यांनी अचूक साथ देत जामनेरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. उबेद खाटिक आणि मनीष चव्हाण यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.
ओम भोसले याचा मॅन ऑफ द मॅच ने गौरविण्यात आले. यावेळी संघ मालक किरण बच्छाव, अतुल कोगटा, गौरव साफळे, ॲड. सूरज जहांगीर, हितेश मंडोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
 *थोडक्यात धावफलक:* 

जळगाव कोगटा किंग्स: २० षटकात १९६/८ (ओम भोसले ६४, जितेंद्र नाईक ६४; ललित पाटील ३/२७)
जामनेर सातपुडा हिरोज: १९.४ षटकात ८५/१० (मसूम खाटिक २१, रामकृष्ण राठोड १६; सागर भावर ३/१२, राज बेलदार २/२)