जळगावात भाजपाचा व्हीप जारी
नंदकिशोर महाजन यांनाच प्रथम पसंतीचे मत देण्याचे निर्देश!
महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि गटनेते प्रकाश बालानी यांचे पत्र; सर्व नगरसेवकांना पक्षशिस्तीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश
जळगाव:
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगरच्या वतीने अधिकृत व्हीप (पक्षदेश) जारी करण्यात आला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांच्या विजयासाठी पक्षशिस्त आणि एकजूट कायम राखत सर्व नगरसेवकांनी त्यांनाच प्रथम पसंतीचे मत द्यावे, असे आदेश या व्हीपद्वारे देण्यात आले आहेत.
दिनांक १८ जून २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पूर्वतयारीसाठी भाजपाच्या प्रमुख नेत्यांची आणि नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया, मतदान पद्धती आणि पक्षाच्या धोरणात्मक भूमिकेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
*पसंती क्रमांक '१' महाजनांसमोरच नोंदवा!*
बैठकीत नगरसेवकांना मार्गदर्शन करताना, महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनाच प्रथम पसंतीचे मत देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. मतदान करताना मतपत्रिकेवर पसंती क्रमांक १ हा नंदकिशोर महाजन यांच्या नावासमोरच नोंदवावा, तसेच मत अवैध ठरणार नाही यासाठी कोणती तांत्रिक खबरदारी घ्यावी आणि निवडणूक आयोगाच्या कोणत्या नियमांचे पालन करावे, याचे सविस्तर प्रशिक्षण या वेळी लोकप्रतिनिधींना देण्यात आले.
*पक्षादेश बंधनकारक; गटनेते आणि महानगराध्यक्षांचे पत्र*
भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि मनपा गटनेते प्रकाश बालानी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने हा व्हीप जारी करण्यात आला आहे. पक्षाचा हा आदेश सर्व सदस्यांवर कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या बंधनकारक असून, याचे काटेकोर पालन करावे असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. महायुतीची एकजूट दाखवून देत महाजन यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी गटनेत्यांनी केले.
*नगरसेवकांचा विजयाचा निर्धार*
या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेचे स्वागत करत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी १८ जून रोजी होणाऱ्या मतदानात महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही सर्व लोकप्रतिनिधींनी या वेळी सामूहिकपणे व्यक्त केला.
No comments:
Post a Comment