Sunday, 11 September 2022

क्या होते है 'उर्दु घर'-जलगांव मे भी उर्दु घर की मांग...

उर्दु घर म्हणजे काय?
क्या होते है उर्दु घर?
जलगांव मे भी हो उर्दु घर....
(अयाज़ मोहसिन,चिफ एडिटर "इंडिया365" की रिपोर्ट,सूत्र महाराष्ट्र सरकार)

*महाराष्ट्रातील उर्दू घरे*

भारतात जन्मलेल्या आणि त्यामुळे अस्सल भारतीय असलेल्या उर्दू भाषेची वाङमयीन प्रगती व्हावी, तसेच मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण वाढावी यासाठी राज्यामध्ये ४ उर्दू घरांची निर्मिती करण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या या उपक्रमाविषयी माहिती देणारा हा विशेष लेख...

००००

बात करनेका हसीं तौर-तरीक़ा सीखा, हमने उर्दूके बहानेसे सलीक़ा सीखा...

उर्दू भाषेचे वर्णन करताना कवी मनीश शुक्ला यांनी हा शेर रचला आहे. उर्दू ही एक अतिशय गोड भाषा मानली जाते. भारतीय साहित्याच्या विकासात उर्दू भाषेने बहुमोल असे योगदान दिले आहे. मुळात उर्दू भाषेचा जन्म भारतातच झालेला असल्याने ही एक अस्सल भारतीय भाषा आहे. महाराष्ट्रामध्येही उर्दू भाषेचा मोठा प्रभाव असून विशेषतः  बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांच्या निर्मितीमध्ये उर्दू भाषेने आपल्या रसाळ वाणीने गोडवा आणला आहे. मराठवाडा, खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये उर्दू भाषेच्या रसिकांची संख्या फार मोठी आहे. अशा या रसाळ उर्दू भाषेची वाङमयीन प्रगती व्हावी, तसेच मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सर्जनशील विचारांची देवाण-घेवाण वाढावी यासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येतात. उर्दू भाषेच्या विकासासाठी एक ठिकाण असावे या उद्देशाने राज्यातील काही उर्दू भाषिकबहुल शहरांमध्ये उर्दू घर उभारण्यात येत आहेत.

सद्य:स्थितीत नांदेड, मालेगाव, सोलापूर आणि नागपूर येथे उर्दू घरे उभारण्यात येत आहेत. नांदेड आणि मालेगाव उर्दू घराचे काम पूर्ण झाले असून सोलापूर उर्दू घराचे काम अंतिम टप्प्यात आहे. नागपूर उर्दू घराचे काम सुरु आहे. नांदेड उर्दू घराचे उद्घाटनही करण्यात आले आहे. या उर्दू घरामध्ये कॉन्फरन्स हॉल, वाचनालय, क्लासरुम, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी १ कक्ष, पाहुण्यासांठी २ कक्ष तसेच १ ग्रीन रुम बांधण्यात आलेली आहे.

या घरांचा वापर, देखभाल, दुरुस्ती तसेच ती सुस्थितीत ठेवण्यासाठी धोरण आखण्यात आले असून सविस्तर नियमावली जारी करण्यात आलेली आहे. उर्दू घराच्या इमारती या राज्य शासनाच्या मालकीच्या राहतील, उर्दू घराचे नियंत्रण व व्यवस्थापन संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले उपजिल्हाधिकारीपेक्षा कमी नाही अशा दर्जाचे अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले आहे. 

उर्दू घरांचा वापर हा प्रामुख्याने व प्राधान्याने उर्दू भाषेचा प्रसार व विकास, उर्दू साहित्याचा व कलात्मतेचा प्रसार व विकास, नाट्य, शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्य व त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी करण्यात यावा. इतर वेळी संबंधित जिल्हाधिकारी वा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने उर्दूशिवाय अन्य भाषांच्या साहित्यिक व सांस्कृतिक स्वरुपाचे कार्यक्रम घेण्यासाठी उर्दू घराचा वापर करता येईल, असेही धोरण निश्चित करण्यात आले आहे. उर्दू भाषा, मराठी भाषा आणि इतर भाषांमध्ये देवाण-घेवाण वाढावी, हा यामागे उद्देश आहे. उर्दू घरांमध्ये आयोजित करावयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक समिती तसेच प्राधिकृत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे.

उर्दू घरांमध्ये वर्षातील अधिकाधिक दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन कार्यक्रम इत्यादी स्वरुपाचे कार्यक्रम होतील. उर्दू घरातील वाचनालय/ ग्रंथालयामध्ये उर्दू, मराठी आणि हिंदी भाषेतील वर्तमानपत्रे, उर्दू भाषेतील नियतकालिके, पुस्तके उपलब्ध असतील. नवी दिल्ली येथील नॅशनल काऊन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज या संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रम यांच्या धर्तीवर उर्दू घरांमध्ये प्रशिक्षण, अभ्यासक्रम चालविण्यासाठी काऊन्सिलकडून अनुदान, मार्गदर्शन मिळविण्याचे प्रयत्न केले जातील. त्या अनुदानातून काऊन्सिलमार्फत चालविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या धर्तीवर उर्दू भाषिक नसलेल्या समुदायाला उर्दू शिकविण्यासाठी उर्दू घरामध्ये वर्ग सुरु करण्याचे प्रयत्न केले जातील.

कोणत्याही परिस्थितीत उर्दू घराचा वापर राजकीय, खाजगी किंवा धार्मिक उद्दीष्टांकरिता करण्यात येणार नाही, असे निदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाकरिता उर्दू घर प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येईल व त्यासाठी कोणत्याही शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही. तसेच उर्दू भाषा व उर्दू साहित्याशी संबंधित कार्यक्रमांकरिता सवलतीचे दर आकारण्यात येतील, असे धोरण निश्चित करून तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 

भाषा ही नेहमीच समाजाला जोडण्याचे काम करते. उर्दू भाषेने आपल्यातील गोडवा, इतरांप्रती व्यक्त होणारा आदरभाव अशा अनेक गुणांनी इतर भाषिक लोकांच्या मनातही स्थान निर्माण केले आहे. उर्दू भाषा, त्यातील गजला, शेरोशायरी लोकांना नेहमीच आवडतात, सर्वच भाषकांची याला नेहमीच दाद मिळते. त्यामुळे उर्दू भाषेने देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यालाच अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक विकास विभागामार्फत उर्दू घरांची निर्मिती करून या भाषेच्या विकासाला तसेच मराठी-उर्दूची देवाणघेवाण वाढविण्याला चालना देण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये उभी राहत असलेली ही ४ उर्दू घरे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक विकासात बहुमोल योगदान देतील, असे निश्चितपणे वाटते.

शेवटी अशोक साहिल यांच्या उर्दू भाषेविषयी प्रेम व्यक्त करणाऱ्या या शायरीने या लेखाचा समारोप करतो. ते म्हणतात - 
उर्दूके चंद लफ़्ज़ हैं जबसे ज़बान पर, तहज़ीब मेहरबाँ है मेरे ख़ानदान पर...

००००

Friday, 26 August 2022

सर्जा राजा चा असाही भावनिक सन्मान !

*जैन हिल्स येथे सर्जा-राजाचा पोळा सण उत्साहात साजरा*

*जळगाव दि.26 (प्रतिनीधी)* - संबळचा तालबद्ध सूर… ऋषभराजाला पांघरलेले झूल… पायातील घुंगरू गळ्यातील घंट्याचा एक स्वर… डौलात निघालेली मिरवणूक... पावरी नृत्य, आदिवासी नृत्य सोंग व घोडा, गुरख्या डेंगा… हनुमान पार्वती मोर नंदीनृत्याविष्कार.. ढोल बाजाचा गजर… ऋषभराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक सहकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद... ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे, जैन इरिगेशन अध्यक्ष श्री. अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांच्या फुगडीसह... विदेशी नागरीक डॅनियल हदाद (इस्त्राईल) यासह मान्यवरांनी, अनुभूती स्कूलचे विद्यार्थ्यांनी, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाद्यांवर नृत्यांसह ठेका धरत आनंद द्विगणीत केला. जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास केंद्रावर बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा झाला.

जैन कृषि संशोधन केंद्राच्या ध्यानमंदिरापासून मिरवणूकीस सुरवात झाली. श्रद्धाज्योत या श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या समाधीस्थळी बैलांच्या मिरवणूकीने प्रदक्षिणा घातली व वंदन केले. त्यानंतर श्रद्धाधाम, सरस्वती पॉईंट मार्ग सवाद्य मिरवणू्क काढण्यात आली होती. मुख्य सोहळा जैन हिल्स हेली पॅड येथील मैदानावर झाला. यावेळी व्यासपीठावर अणूशास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, महात्मा गांधीजींचे पणतू श्री. तुषार गांधी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, श्री. राजा मयूर, डॉ. सुभाष चौधरी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, डॉ. एम. पी. मथाई यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्य व शहरातील मान्यवर उपस्थित होते.

अशोक जैन यांनी पोळा फोडण्याच्या सोहळ्यासाठी हिरवी झेंडी दाखविली. सालदार अविनाश गोपाल यांनी पोळा फोडण्याचा मान मिळविला. सौ. ज्योती जैन यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी बैलांचे विधीवत पूजन करून त्यांना गोड घास भरविला. जैन परिवारातील सर्वात लहान सदस्य अर्थम अथांग जैन याच्याहस्ते सुद्धा घास भरविण्यात आला. भव्य अशा व्यासपीठावर सप्तधान्याची रास, शेती उपयोगी अवजारांचे पूजन अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.

*भूमिपुत्रांचा सत्कार*

जैन कृषि संशोधन विकास केंद्रातील विविध ठिकाणांवर 25 च्यावर बैल जोड्या आहेत. त्यांच्यासाठी 35 च्यावर सालदार गडी शेती-मातीत राबत असतात. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व जैन परिवाराच्या हस्ते सर्व सालदारांचा परिवारासह सत्कार व संसारोपयोगी साहित्य भेट सन्मानाने देऊन गौरव करण्यात आला.

'भारतीय संस्कृती, कृषी सांस्कृतिक वैभवाचा जैन हिल्स परिसरात मला अनुभव आला. प्रत्यक्ष सहभाग घेता आल्याने मी स्वत: ला भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया डॅनियल हदाद यांनी दिली.’

'ऋषभराजाला ऊर्जास्वरूपात आजही शेतीमध्ये स्थान आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, शेतीमध्ये ऋषभराजाला अनन्य साधारण महत्त्व त्याचमुळे प्राप्त झालेले आहे. पोळ्याच्या दिवशी ऋषभराजाचे पूजन त्याच्या कष्टाप्रती केलेला सन्मानच ठरतो अशी भावना डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.’

'डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी भवरलालजी जैन यांची आठवण काढत पोळा सणात लोकसंस्कृती जोडली याचे नाविन्य जपत त्यांनाही महत्त्वाचे स्थान देण्याचे सुरू केले ही कृषी संस्कृती पुढच्या पिढीनेही जपली आहे याचा आनंद आहे. पोळा हा सण कान्हदेशात सांस्कृतिक मूल्य जोपासणारा ठरलेला आहे असेही ते म्हणाले.’

'सण-उत्सव वर्षभर येत असतात मात्र बळिराजा आणि त्याच्यासोबत राबणाऱ्या सर्जा-राजाचा कृतज्ञता व्यक्त करणारा सण पोळा बंधूभाव जोपासणारा वाटतो. गत 25 वर्षापासून हा सण जैन हिल्सला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी सर्वांनी हिरीरीने सहभाग घेतला याचा आनंद असल्याचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन म्हणाले.’

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले शेतकरी बांधव हे त्यांच्या परिवारासह उपस्थितीत होते. या पोळा सणाच्या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनच्या सर्व विभागातील सर्व सहकारी प्रयत्न केले. या कार्यक्रमात सहकारी हे परिवारासह उपस्थिती होते. यासह अनुभूती निवासी स्कूलमधील 200 हून अधिक विद्यार्थी, गांधी तीर्थ येथे देशभरातून अभ्यासक्रमासाठी आलेले विद्यार्थीही उपस्थितीत होते.


*फोटो कॅप्शन* - (_LDH6203) – ऋषभराजाला पोळा कार्यक्रमाच्या व्यासपीठाकडे घेऊन जाताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, अभेद्य जैन व सहकारी

(_RTM1178) – ऋषभराजाचे विधीवत पूजन करताना सौ. ज्योती जैन, श्री. अशोक जैन व मान्यवर

(_LDH6572) – भुमिपूत्राचा परिवारासह सन्मान करताना सौ. शोभना जैन, सौ. ज्योती जैन, श्री. अशोक जैन.

(_LDH6321) – जैन हिल्स येथे पोळा सणाच्या निमित्ताने तालवाद्यांवर ठेका धरताना ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार.

Wednesday, 24 August 2022

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

*भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर*

*कांताई जैन साहित्य-कला जीवन गौरव पुरस्कार प्रभाकर कोलतेंना;*

*बालकवी ठोमरे, बहिणाई चौधरी व ना. धों महानोर पुरस्कारही जाहीर*

*जळगाव, दि. 24 (प्रतिनिधी)* – जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक 'कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार' जगप्रसिद्ध चित्रकार श्री. प्रभाकर कोलते यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी श्रीमती संध्या नरे-पवार (बोरिवली, मुंबई), श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी श्री. वर्जेश सोलंकी (वसई, मुंबई) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी श्री. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना जाहीर झाला आहे. कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे.

कान्हदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या औचित्याने साहित्य-कला पुरस्कार प्रदान समितीची बैठक जैन हिल्सवर पार पडली. या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, सदस्य रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ. शोभा नाईक, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, विश्वस्त ना. धों. महानोर, सौ. ज्योती जैन यांची उपस्थिती होती. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिक मान्यवरांकडून आलेल्या शिफारसींचा विचार करून सर्वानुमते चारही पुरस्कारांची निवड करण्यात आली. 'भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन' व 'बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट' यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते.

जैन उद्योग समूहाच्या कल्याणकारी अंग असलेल्या ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर ‘बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट’तर्फे कवयित्री बहिणाई पुरस्कार, ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’तर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार देण्याबाबतचे बीजारोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्‍या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते. पहिला पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना सन्मानपूर्वक प्रदान केला आहे. तर यंदाचा दुसरा पुरस्कार जागतिक दर्जाचे चित्रकार प्रभाकर कोलते यांना जाहीर झाला आहे.

*कोट..*

बृहृन्महाराष्ट्रातील श्रेष्ठ लेखकांच्या निवड समितीने एकमताने केलेली ही निवड आतापर्यंतच्या कला-साहित्य पुरस्कार प्राप्त लेखकांच्या परंपरेत शोभून दिसतात.

-    *डॉ. भालचंद्र नेमाडे*, अध्यक्ष, निवड समिती

*कोट..*

कला-साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविधस्तरावर रचनात्मक कार्य जैन उद्योग समूहातर्फे सुरूच असते. बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या औचित्याने भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारे कला-साहित्य पुरस्कार जाहिर करताना आनंद होत आहे.
-    *अशोक जैन*, अध्यक्ष, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन

*परिचय*

1)       *प्रभाकर कोलते* - 'कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार' ज्यांना जाहीर ते प्रभाकर कोलते मुंबई येथील जे.जे. कला महाविद्यालयात कलाशिक्षण घेऊन तेथेच हाडाचे प्राध्यापक होते. प्रभाकर कोलते कला शिक्षणाविषयी आपलं मत अतिशय प्रभावीपणे आणि स्पष्ट मांडतात त्यामुळेच ते कला विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय आहेत. भारतीय अमूर्त कलेतील सध्याच्या नामांकित चित्रकारांमध्ये प्रभाकर कोलतेंचे नाव अग्रस्थानी आहे. अमूर्त कलेवर भाष्य करणारे आणि लिहीणाऱ्या अतिशय दुर्मिळ जागतिक दर्जाच्या चित्रकारांमध्येही ते पुढे आहेत. भारतीय अमूर्त कलेमध्ये काम करणाऱ्या क्रियाशील पिढीमध्ये बहूतांश चित्रकारांवर प्रभाकर कोलते यांचा प्रभाव आहे. संत परंपरेचा अभ्यास करून अमूर्ततेतील अध्यात्म सांगणारा योगी चित्रकार म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या अनेक चित्रमालिका देशात-परदेशात गाजलेल्या आहेत.

2)       *संध्या नरे-पवार* -  श्रेष्ठ लेखिका म्हणून कवयित्री बहिणाई पुरस्कारासाठी संध्या नरे-पवार यांची निवड झाली. मुक्तपत्रकार व संधोधनपर लेखनामध्ये त्यांचे साहित्य आहे. आदिवासी स्त्रीयांविषयी संवेदनशील वास्तव मांडून अमानवी प्रथांवर प्रखड भाष्य करणारे ‘डाकीण’, ‘तिची भाकरी कोणी चोरली’ या पुस्तकांसह त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत.
3)       *प्रवीण दशरथ बांदेकर* – सावंतवाडी येथील आरपीडी कॉलेज येथे इंग्रजीचे अध्यापन करतात. त्यांनी कविता, कादंबरी, ललित, समीक्षा आदी लेखन केले असून कविता संग्रह – ‘येरू म्हणे’, ‘खेळखंडोबाच्या नावानं...’, ‘चिनभिन’, कादंबऱ्या – ‘चाळेगत’, ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’, ‘इंडियन अॅनिमल फार्म’, ललित लेख संग्रह – ‘घुंगुरकाठी’,  ‘हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध’, बालसाहित्य- ‘चिंटू चुळबुळे’ अशी पुस्तके प्रकाशित झाली आहे.
4)       *वर्जेश सोलंकी* - वर्जेश सोलंकी हे आगाशी ह्या लहानशा खेड्यात वास्तव्यास असून महाविद्यालय जीवनापासून काव्यलेखनाला त्यांनी सुरूवात केली. वर्जेश ईश्वरलाल सोलंकींच्या ‘कविता’, ‘ततपप’, ‘वेरविखेर’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध, ‘दीडदमडीना’ (ललितगद्य), ‘पेरूगन मुरूगन’ (लघुकांदबरी), ‘वृद्धशतक’  व ‘अनेक एक’ (कवी कमल वोरा ह्यांच्या गुजराती कवितांचा मराठी अनुवाद), ‘हुसैनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका’ (कथासंग्रह) इत्यादी साहित्य प्रकाशित असून अनेक कविता व कवितासंग्रहाचा अभ्यासक्रमात समावेश आहे.

*फोटो कॅप्शन (_RTM0556)* – भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य-कला पुरस्कार निवडप्रसंगी निवड समितीचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र नेमाडे, सदस्य रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ. शोभा नाईक, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, विश्वस्त ना. धों. महानोर, सौ. ज्योती जैन.

Tuesday, 23 August 2022

आदित्य ठाकरेंचा दौरा आणि महागडे शौच..

नुकतंच आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा संपन्न झाला,त्यावेळी जागोजागी गर्दी झाल्याचे चित्र दिसले.धरणगावात वर्दळी च्या मुख्य चौकात हजारो ची गर्दी झाली होती मात्र अंदाजे 2,3 तास थांबून असलेल्या कार्यकर्त्यांना तसेच काही लोकांना जोरात लागली होती.अशावेळी काहींनी जवळ असलेल्या धरणगाव बस स्टँड येथील (अ)सुलभ शौचालया ला 'अनिच्छेने' सदिच्छा भेट दिली असता,तब्बल 10 रु.प्रति शौच अशी महागडी हागणखडी पाहून अनेकांनी आपल्या 'वेदना दाबत' इतर पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला.विशेष म्हणजे सदर शौचालय हे कुठल्या 'सुविधांचे' एवढे 10 रु मोजत होते हे अनाकलनीय होय.घाणीचे साम्राज्य पाहून आलेली शौच परत जावी अशी परिस्थिती होय,दारांना कडी नाही (कुणी येऊ नये म्हणुन गाणी गावी लागतात),साबण लपवून ठेवलेला असतो,महिला आणि पुरुष साठी एकच 'पुरुष' व्यक्ती पैसे गोळा करतो (आत मध्ये) त्या मुळे महिला भगिनी यांना लज्जा उत्पन्न होते.

धरणगाव ही सर्व प्रकारच्या गुलाबांची बाग आहे,गुलाबराव पाटील,गुलाबराव देवकर,गुलाबराव वाघ,गुलाबराव महाजन,गुलाबराव माळी,गुलाब तडवी,गुलाब पिजारी,असे अनेक गुलाब दरवळत असताना 'जुलाब' झालेल्या काही नागरिकांना विशेषतः बस प्रवास करणाऱ्याना धरनगावतील हे शौचालय भलतंच 'महाग' झालंय,प्रश्न उपस्थित होत आहे की आता गरिब माणसाने शौचालाही जायचे की नाही? सहन होत नाही,सांगता येत नाही,आणि दाखवता बिलकुल येत नाही....

*पारंपारिक 'नकटे बनिये' च्या दुकानावर छापा,आढळून आल्या दुर्मिळ वनस्पती आणि प्रतिबंधित प्राण्याचें अवशेष..**वडिलोपार्जित दुकानामुळे डॉक्टर नाहक बनला बळीचा बकरा...*वाचा सविस्तर "ब्लॉगस्पॉट इंडिया365 लाईव्ह"✒️ अयाज मोहसिन..

जळगाव--येथिल जिल्हापेठ  हद्दीत एक दुकानदार दुर्मीळ वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष विकत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती,या संदर्भात विभागाने संबंधित दुकानावर छापा टाकत कासव पाठ,नाग मणके,इंद्रजाल,घुबडनखे,समुद्री घोडा अवशेष,हातजोडी,रान मांजर नखे,इत्यादि अत्यन्त दुर्मिळ,महाग,आणि वन्य जीव कायदा 1972 परिशिष्ट 1 व 2 नुसार सदर वस्तू जमा करत,3 लोकांना अटक केली,डॉ.अजय कोगटा (53 वर्ष) दुकान मे.रामचंद्र मूलचंद कोगटा, चुणीलाल पवार,यांना अटक व 3 दिवसीय वनकोठडी तसेच  लक्ष्मीकांत मणियार यांना अटक व 3 दिवसीय न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी अवशेष लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी तसेच गुप्तधन प्राप्त करण्यासाठी उपयुक्त असतात असा गैरसमज आहे,त्यामुळे संबंधित प्राण्यांची हत्या करून त्यांचे अवशेष महागडे विकली जातात.

या संदर्भात अधिक माहिती घेतली असता डॉ कोगटा हे जळगावातील प्रख्यात हाडांचे डॉक्टर असून सदर दुकान व्यवसाय हा त्यांना वारसा हक्काने मिळालेला असून,वडिलांचे निधन झाल्याने इतर व्यक्ती ते दुकान चालवत असते,डॉक्टरांचा थेट संबंध येत नाही मात्र सुख्या सोबत ओले ही जळते असा मतप्रवाह आहे.

Monday, 8 August 2022

जळगाव जिल्ह्याला तब्बल 3 मंत्रिपदे?

*मंगळवारी मंत्रिमंडळ मंगळ होणार..*

*जळगाव जिल्ह्याला 3 तब्बल 3 मंत्रिपदे?*

*गिरिश भाऊ,गुलाब भाऊ निश्चित...किशोर अप्पाना धावपळी चे बक्षिस मिळणार?*

ब्लॉग "इंडिया365लाईव्ह"--अयाज मोहसिन✒️

विविध कारणांमुळे वारंवार प्रलंबित होणारा मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी संपन्न होणार असे दिसतंय त्याला कारण आहेत संभव मंत्रिमंडळ मधिल गिरीश महाजन,गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील यांना मुंबई येथे मंगळवारी उपस्थित राहण्याचे 'खास' फोन.अनुभव आणि वरिष्ठता लक्षात घेता माजीमंत्री गिरीष महाजन आणि गुलाबराव पाटील यांचे कॅबिनेट मंत्रिपद जवळपास निश्चित समजले जात आहे,किंबहुना दोन्ही माजीमंत्री यांना त्यांचे जुणेच खाते परत मिळण्याची खूप मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे.सोमवारी सायंकाळी जळगाव शहरात आणि जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असतांना भावी मंत्र्यांच्या समर्थकांनी मात्र आनंदाची आंघोळ घातली आहे.विशेषतः पाचोरा येथील आमदार किशोर अप्पा पाटील यांना आलेल्या 'सूचक' फोन नंतर त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारे हास्य ,लपवून ही लपत नव्हते.त्याला कारण आहे अप्पा यांचे नामदार शिंदे यांच्याशी असलेले निकटवर्तीय संबंध.निदान राज्यमंत्रीपद तरी जवळपास शक्य आहे.

एकूणच जळगाव जिल्ह्यातील जनतेला आगामी काळात कदाचित एकसोबत 3 मंत्रिपदे पाहण्याचे योग येऊ शकतात,मात्र तेवढा विकास सुध्दा व्हावा या माफक आणि रास्त अपेक्षा.

Sunday, 24 July 2022

जैन स्पोर्टस एकेड्मी चे प्रविण ठाकरे यांची चेस ओलिम्पियाड पंच म्हणून निवड

*४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे  प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती* 

*जळगाव  दि. २२ प्रतिनिधी* :-
चेन्नई (महाबलीपुरम्) येथे २८ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून व तमिळनाडू शासनाने पुरस्कृत केल्यामुळे या स्पर्धा पहिल्यांदाच भारतात होत आहेत. या जगातील सर्वात मोठ्या व महत्त्वाच्या स्पर्धेसाठी जळगावचे जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे फिडे पंच प्रवीण ठाकरे यांना सामना पंच म्हणून नियुक्त केल्याचे जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) जाहीर केले आहे. यापूर्वी त्यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई व वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे. असा बहुमान मिळवणारे जळगाव  जिल्ह्यातील ते पहिलेच बुद्धिबळ पंच आहेत. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या बुद्धिबळ ऑलंपियाड स्पर्धेचे यावेळचेे वैशिष्ट्य म्हणजे विक्रमी देशांचा सहभाग, यावेळी तब्बल १८७ देश या स्पर्धेत सहभागी होत असून १८८ संघ खुल्या गटात तर १६२ महिला संघ या सांघिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत अधिकृतरित्या खेळणार आहेत. खुल्या व महिला  गटात स्वतंत्रपणे स्पर्धा खेळविली जाणार असून  स्विस् लिग पद्धतीने एकूण ११ फेऱ्यांअंती अंतिम विजेते संघ घोषित केले जातील. भारताकडून आपले सर्वोत्तम संघ यात सहभागी असून खुल्या व महिला या दोन्हीही गटांमध्ये भारतीय चमुंचा ' अ ' , ' ब ', व ' क ' असे अनुभुवी व तरुण वर्गांचा समावेश असलेले संघ उतरतील.
जगजेत्ता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसनसह जगातील सर्वोत्तम १७५० बुद्धिबळपटू त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक व २०५ नियुक्त केलेले पंच मिळून जवळपास २२०० प्रतिनिधी या सर्वांची चोख व्यवस्था अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या स्पर्धा व्यवस्थापन समितीने व तामिळनाडू शासनाने केली आहे. एकूण नियुक्त केलेल्या २०५ आंतरराष्ट्रीय पंचापैकी ९० आंतरराष्ट्रीय पंच भारतातील आहेत त्यापैकी  महाराष्ट्रातील अकरा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंचांची निवड झाली आहे. प्रवीण ठाकरे हे गेली २० वर्षांपासून बुद्धिबळ संघटक, संयोजक, प्रशिक्षक व पंच म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमी, जळगाव  जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची व क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मानाचा 'गुणवंत क्रीडा मार्गदर्शक' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव  केला होता. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या पंच कमिटी चे सचिव म्हणून कार्यरत आहेत तर याचबरोबर विविध भूमिकेतून बुद्धिबळ क्षेत्राच्या वाढीसाठी ते सातत्याने कार्यरत असतात.
या निवडीसाठी प्रवीण ठाकरे यांचे आखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या त्यांच्या यशासाठी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, चंद्रशेखर देशमुख, पद्माकर करणकर, शकील देशपांडे, आर. के. पाटील, जैन स्पोर्ट्स चे समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, नरेंद्र पाटील, संजय पाटील, यशवंत देसले, तेजस तायडे  यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष गिरीश चितळे, नरेंद्र फिरोदिया, विनय बेळे, पी. बी. भिलारे, सचिव निरंजन गोडबोले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.